अकोला - पती पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर मायलेकाने बाळापूरजवळ असलेल्या मन नदीत आत्महत्या केली. तर पतीनेही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. ही घटना बाळापूर येथे घडली आहे.
बाळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य सेवा समितीमध्ये नोकरी करणाऱ्या मनीषा गोविंद पाटील हिला मृत पहिल्या पतीपासून प्रसाद प्रकाश पाटील हा 15 वर्षांचा मुलगा आहे. तर मनिषाचा दुसरा पती सोपान महादेव हगोने हा नांदगाव खंडेश्वर येथे नोकरीवर असून तो सध्या शिवसेना वसाहतीत राहतो. मनीषा आणि सोपान यांच्यात नेहमी काही कारणावरून भांडण होत होते. त्यामुळे त्यांचा हा वाद सोडवण्यासाठी मनिषाचे नातेवाईक तिच्या घरी आले होते. दोघांमध्ये समेट घडून आणल्यानंतर नातेवाईक घरी परत गेले. मंगळवारी सायंकाळी मनीषा नोकरीवर जाते असे सांगून मुलगा प्रसाद यास सोबत घेवून दुचाकीवर निघून गेली. तर सोपान घरातून नोकरीवर निघून गेला. मनिषाचा भाऊ हा तिच्याशी मंगळवारी सायंकाळी मोबाईलवर संपर्क करित होता. परंतु, ती फोन उचलत नव्हती. तर दुसरीकडे बाळापूर पोलिसांना मंगळवारी रात्री दहा वाजता मन नदीजवळ एक दुचाकी बेवारस असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दुचाकीच्या डिक्कीतुन मोबाईल घेतला. त्यावर आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मायलेकाने नदीत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मन नदीत सकाळी पोलिसांनी जवळच असलेल्या कोळी लोकांच्या सहाय्याने या दोघांचा शोध घेतला. तिथे मुलगा प्रसादचा मृतदेह सापडला आहे. परंतु, मनिषाचा मृतदेह दुपारपर्यंत मिळाला नाही.
सोपान हा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येत असताना त्याने बाळापूर शहरात दाखल झाल्यानंतर लघुशंकेला जातो असे सांगून विष घेऊन केले. सोपान हा लवकर न आल्याने त्याचा शोध घेतला असता तो खाली पडलेला दिसला. बाळापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नदीत बेपत्ता असलेल्या मनीषा पाटीलचा शोध उद्या, (गुरुवारी) सकाळी संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथक घेणार आहेत, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
हेही वाचा-आई मी मरत आहे, तू आनंदी राहा... असे शाळेच्या बोर्डावर लिहून विद्यार्थ्याची आत्महत्या