अकोला - आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीचे रक्त दिल्याप्रकरणी आज बी.पी. ठाकरे ब्लड बँक मनपा आरोग्य विभागाने सील केली. तसेच, ही बँक अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अशी कारवाई ही अकोल्यातीलच नव्हे तर, राज्यातील पहिली असल्याचे बोलल्या जात आहे.
हेही वाचा - अजित पवारांना फक्त पैसा कळतो, चंद्रकांत पाटलांचा गंभार आरोप
यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पटोकार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केल्यानंतर अशा कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी तथा मनपा प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांनी दिले. दरम्यान, या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने ही बातमी दोन सप्टेंबर रोजी प्रकाशित केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, हे विशेष.
काय आहे प्रकरण?
मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील रहिवाशी महिलेने १९ ऑक्टोबर २०२० रोजी एका चिमुकलीला जन्म दिला होता. जन्मानंतर चिमुकलीची प्रकृती ठीक राहत नसल्याने तिच्यावर मूर्तिजापूर येथील अवघाते रुग्णालयात उपचार केले होते. उपचारादरम्यान चिमुकलीच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे तिला पांढऱ्या पेशी देण्यासाठी अकोला येथील बी.पी. ठाकरे रक्तपेठीतून प्लेट्सलेट मागविण्यात आल्या होत्या. या प्लेट्सलेट एचआयव्ही संक्रमित व्यक्तीच्या असल्यामुळेच चिमुकलीलासुद्धा एचआयव्हीची बाधा झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली.
आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे दिले होते आदेश
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न व औषधी प्रशासन अशा सात सदस्यीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. गेली दोन दिवस चौकशी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबई आणि केंद्रातील अधिकारी या चौकशी समितीत सहभागी होते. त्यांच्या चौकशीमध्ये बी.पी. ठाकरे ब्लड बँकेतच तांत्रिक दृष्ट्या दोश आढळून आला. हा गोपनीय अहवाल जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पटोकार यांनी सादर केला. या अहवालात तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले. तसेच, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही ब्लड बँक मनपा आरोग्य विभागाने सील केली असून पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन करणार आहे.
या अहवालानुसार आता बी.पी. ठाकरे ब्लड बँकेवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ज्या रुग्णालयात त्या चिमुकलीला रक्त देण्यात आले, त्यांनीही रक्त तपासून देणे आवश्यक होते. मात्र, तसा प्रकार यामध्ये झाला नसल्याचेही दिसून येत नाही. परिणामी, त्या रुग्णालयावर कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - चिमुकल्यांना विकत घेऊन मागायला लावत होत्या भिक; पोलिसांनी केले दोन महिलांना जेरबंद