अकोला - अवैद्य दारू विक्री करणाऱ्या चार आरोपींसह दोन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना ग्रामपंचायत गायगांव येथून अवैद्य दारुसाठा आजूबाजूच्या गावात नेऊन विकला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी साफळा रचत ही कारवाई केली.
ग्राम गायगांव येथील सरकारमान्य देशी दारूच्या दुकानातून अवैधपणे मोठया प्रमाणात देशी दारुची विक्री होत आहे. या दुकानातील दारू, मोटरसायकलवर अवैधपणे आजूबाजूच्या खेडेगावातील लोकांपर्यंत पोहचवण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी ग्रामपंचायत निमकर्दा ते पारस रोड तसेच निमकर्दा ते बोराळा रोडवर सापळा रचला. त्यात पोलिसांनी चार आरोपींसह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सागर दादाराव खंडारे, अनिल आनंदा घोगले, कमलेश तेजराव खंडारे हे एका पाठोपाठ एक त्यांच्या मोटर सायकलवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्यापासून दोन मोटर सायकल, दोन मोबाईल व देशी दारूच्या ३३६ क्वॉर्टर असा एकूण एक लाख ६३ हजार ७७२ रुपयांचा मुदेमाल जप्त केला. तसेच राज लक्ष्मण इंगळे याच्याकडून एक मोटर सायकल, मोबाईल व देशी दारूच्या १४२ क्वॉर्टर असा एकूण ७६ हजार ३८४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा - 'अकोल्यात वंचितांना सत्ता देण्यासाठी आलो, बाळासाहेब आंबेडकरांना माझी ऑफर'
हेही वाचा - मशिदीत घुसला बिबट्या ; चार जणांना केले जखमी, जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू