अकोला- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद आहेत. अशावेळी अनेक व्यापारी धान्याची साठेबाजी व भाववाढ करुन धान्य विकत आहे. यामुळे ग्राहकांची लूट होत आहे. या लुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाचे शहर भाववाढ व साठेबाजी नियंत्रण पथक किराणा बाजारात घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे धान्याच्या भावाची चौकशी करीत असून रेटबोर्ड लावण्याचे आदेश देत आहे.
हेही वाचा- कोरोनाची धास्ती: एल्गार परिषदेच्या आरोपींची जामीनासाठी याचिका
कोरोना विषाणूमुळे बाजारपेठ बंद झाल्याने किराणा वस्तूची भाववाढ झाली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून याची दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाचे शहर भाववाढ व साठेबाजी नियंत्रण पथके तयार करण्यात आली आहे. किराना बाजारातील घाऊक व किरकोळ विक्रेत्याकडे जाऊन ते मालाच्या साठ्याबाबत, भाव, रेटकार्ड, सोशल डिस्टन्सिंग, यासह वजनमापाचे प्रमाणपत्र पाहणी करीत आहे.
ज्यांच्यावर शंका येत आहे. त्यांची कसून चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईचा दंडुका उगारण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात चार पथके तयार करण्यात आली आहे. शहरातील पथकामध्ये तपासणी अधिकारी रवींद्र एन्नावार, पुरवठा निरीक्षक संतोष कुटे, पुरवठा निरीक्षक जॉकी डोंगरे यांच्या सह आदींचा समावेश आहे. दरम्यान, या पथकाच्या तपासणीमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.