अकोला - जेवणाचे पैसे न देता हॉटेलमध्ये तोडफोड करून पसार झालेल्यांविरोधात हॉटेल मालकाने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पातूर रोडवरील अंबिका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा घडली होती. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी आज घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
पातूर रोडवरील अंबिका हॉटेलमध्ये काही युवक जेवणासाठी आले होते. त्यांनी जेवण केल्यानंतर ते जात असताना हॉटेलवरील कर्मचाऱ्यांने त्यांना जेवणाचे पैसे मागितले. त्यावेळी युवकांनी हॉटेलमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. पातूर रोडवरील हॉटेल चालकांना असाच त्रास असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेने हॉटेल व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत हॉटेल मालक सवेश बुंदेले यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी यामध्ये कलम 385 व तणाव निर्माण करणे यावरून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अद्याप कोणालाही अटक झाली नसून पोलिसांनी दुपारी घटनास्थळी पंचनामा केला आहे.