अकोला - अकोला शहरामध्ये आज दुपारी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला. 30.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. दरम्यान, हवामान वेधशाळेने कोकण परिसरात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. शहरातील काही भागांमध्ये पाऊस पडला नसल्याची माहिती आहे. दिवसभरात या पावसामुळे कुठलेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील अकोट, पातुर आणि बार्शीटाकळी या परिसरातही पाऊस पडला आहे.
पावसामुळे अनेकांची तारांबळ
अकोला शहरात सकाळपासून कडक ऊन होते. मात्र, दुपारनंतर वातावरणात बदल होत गेला आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारी साडेतीन नंतर जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस पडला. पाऊस सुरू झाल्यानंतर काही वीज पुरवठा खंडित झाला होता.
शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू
शेतकऱ्यांसाठी हा पाऊस आशादायी ठरला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वीच पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. राज्यात सात जून नंतर पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. मान्सून दाखल झाला असल्याने हा पाऊस लवकर पडेल आणि चांगला पडेल असेही हवामान विभागाने सांगितले होते. मात्र, अकोला शहरामध्ये आधीच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांचे शेत तयार आहे. पेरणीयुक्त पाऊस पडल्यास शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, दुपारी पाऊण तास पडलेल्या पावसाने शहरातील नाले तुडुंब भरून गेली. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे केली नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये नाले तुडुंब भरली. मात्र, पाऊस पडल्यानंतर दमट वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे आणखीन पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.