अकोला - आज जिल्ह्यात सायंकाळी मोसमी पावसाने हजेरी लावली. आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या पावसामुळे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे.
मोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून आज जिल्ह्यात सर्वदूर पावसाने विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. मृगनक्षत्र सुरू झाले तेव्हापासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. मात्र, आज झालेल्या मोसमी पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसापूर्वी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत कसून ठेवले होते. त्यांना फक्त पावसाची प्रतीक्षा होती. शेवटी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीसाठी तयार झाला आहे. त्याचबरोबर बियाणे खरेदीसाठी शेतकरी आता कृषी केंद्राच्या दुकानात गर्दी करणार असल्याचे चित्रही दिसून येणार आहे.