अकोला - जिल्ह्याला गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणाने आच्छादून टाकले आहे. अधूनमधून पावसाची रीप-रीप, ग्रामीण भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतकऱ्यांना त्रस्त केले असून त्यांचे हातचे पीक जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीचा दुसरा दिवस असताना पावसाचे जोर कायम असून आज सकाळपासूनच पावसाने रिमझिम आणि नंतर जोरदार हजेरी लावली. दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजीमध्ये पावसाचीच अतिषबाजी जोरदार असल्याने ही दिवाळी पावसाळी दिवाळी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
परतीचा पाऊस लांबला असल्यामुळे सर्वत्र राज्यभरात हवामान खात्याने अतिवृष्टीचा तसेच दक्षतेचा इशारा दिला होता गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणाने थंडावा निर्माण झाला होता. या ढगाळ वातावरणाने शेतातील पिकांचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. त्यामधून होणारा रिमझिम आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाने तर शेतात पाणी साचले आहे. परिणामी शेतकऱ्यांचा हायब्रीड कापूस सोयाबीन काढणीला आलेले हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. हाती आलेले पीक डोळ्यादेखत जात असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक चणचण ऐन दिवाळीत निर्माण झाली आहे. त्यामुळे या दिवाळीतही शेतकरी आनंदी नसल्याची स्थिती झाली आहे.
हेही वाचा - 'वंचित'च्या गडात युतीचा भगवा फडकला...
दरम्यान, सततच्या पावसामुळे मात्र सर्वत्र वातावरण थंड झाले असून बऱ्याच नागरिकांना महिलांना व लहान मुलांना सर्दी खोकला व ताप याचा आजार जडत आहे. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे पाऊस आणखीन लांबल्यास साथीच्या आजाराची भीती व्यक्त केल्या जात आहे. दिवाळीमध्ये मुख्य रस्त्यांवर बाजारपेठ असलेले आहेत. परंतु, या पावसामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला असून मातीची खेळणी पूर्णपणे ओली झाली.
हेही वाचा - निष्क्रीय भरारी पथकाबाबत चौकशी करून कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन