अकोला - विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह अकोला शहरामध्ये शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाडा सहन करणारे नागरिक आता सुखावले आहेत. शेतातील पिकांनाही नवसंजिवनी मिळाल्याने शेतकरी आनंदात असल्याचे चित्र पहायला मिळाले.
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने गुरुवारी हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस पुन्हा येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते होती. आज पहाटेपासून ढगाळ वातावरण, जोरदार वारा आणि अधूनमधून विजेचा कडकडाट असे वातावरण होते. वातावरणातील गर्मीने अकोलेकर दिवसभर परेशान झाले होते. पाऊस केव्हाही येऊ शकतो, अशी परिस्थीती तयार झाली होती. मात्र, बऱ्याच प्रतिक्षेनंतर सायंकाळी पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात चैतन्य पसरले. आता जोरदार पाऊस पडावा, अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत.