अकोला - राज्यातील आरोग्य विभागात विविध प्रवर्गातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना सेवा पुरवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे एक ते दीड महिन्यात वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांसह सर्वच प्रवर्गातील रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यामध्ये आरोग्य विभागात हजारो विविध पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्यासह अनेक पदे रिक्त असल्यामुळे कोरोना रुग्ण आणि इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फारच ताण सहन करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेता यावर उपाय म्हणून ही सर्व पदे भरण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
हेही वाचा... गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येमुळे विराट कोहली दु:खी, म्हणाला...
पुढील एक ते दीड महिन्याच्या आत राज्यातील 17 हजार पदे कायमस्वरूपी भरण्यात येणार असल्याची आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच कोरोना काळात आवश्यक असलेली जिल्हास्तरावरील पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांना सामावून घेताना त्यांचा अनुभव व इतर बाबी लक्षात घेऊन त्यांना कायम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही टोपेंनी यावेळी सांगितले.
अकोला जिल्ह्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील पद भरती, इतर साहित्यांसाठी लवकरच मंजुरी घेऊन, ही कामे पूर्ण करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील परिचारिका पदभरती जिल्हाधिकारी आणि आरोग्य उपसंचालक यांना दोन दिवसात भरण्याच्या सूचना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अधिष्ठाता डॉ. घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस उपस्थित होते.