अकोला - भाऊ, या पावसाने तर आमच्या जेवणाचीही सोय नाही राहिली, असे म्हणत नागरिकांनी पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याकडे तक्रातींचा पाढा वाचला. पालकमंत्री कडू यांनी तातडीने हजार रुपये देऊन वेळेवर तात्पुरती मदत केली. तेवढाच धीर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री बच्चू कडू हे आले होते.
पूरपरिस्थितीची पाहणी
शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला होता. यामुळे नागरिकांच्या घरांत पाणी गेल्याने त्यांच्याकडील साहित्य वाहून गेले. या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू हे अकोल्यात आले होते. पूरभागात नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी खडकी, खदान, न्यू, खेतान नगर, चांदुर, जेतवण नगर, रिधोरा, शिवसेना वसाहत आदी भागात पाहणी केली.
'सर्व साहित्य वाहून गेले'
घरांचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरात कंबरेइतके पाणी साचले होते. यामुळे घरातील सर्व साहित्य वाहून गेले. तसेच घरांचीही पडझड झाली होती. यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रहारचे नेते मनोज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.