अकोला- वडाळी सटवाई ग्रामपंचायती बाजूला असलेल्या चार प्लॉटचे आठ 'अ' प्रमाणपत्राच्या मागणीसाठी ४ हजाराची लाच मागणाऱ्या सटवाई येथील ग्रामसेवकावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली होती. लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ग्रामसेवकाकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांनी वडाळी सटवाई येथील ग्रामपंचायतच्या बाजूला असलेले चार प्लॉट खरेदी केले. या प्लॉटचे आठ 'अ' प्रमाणपत्र तक्रारदाराने ग्रामसेवक आर.आर.गंडाळे यांना मागितले. या प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक गंडाळे याने तक्रारदार यांना ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही मागणी तक्रारदार यांना मान्य नसल्याने त्यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात सदर ग्रामसेवकाविरूद्ध तक्रार केली. या तक्रारीनुसार अकोला एसीबीने सापळा रचून वडाळी सटवाई ग्रामसेवक गंडाळे याच्यावर ४ हजार रुपये घेताना रंगेहाथ कारवाई केली.
हेही वाचा- केळी उत्पादक शेतकऱ्यांची दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत धाव