अकोला - घरकुल योजनेत नाव टाकण्यासाठी आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांना 10 ते 15 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील अकोली जहागीर येथील ग्रामसेवकावर गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) अद्याप कारवाई केली नाही. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी याबाबत पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने मूर्तिजापूर विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील अकोली जहागीर येथील ग्रामसेवक निखाडे हे गेल्या 12 वर्षांपासून एकाच गावात कार्यरत आहेत. या गावातील ग्रामस्थांना इंदिरा आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक निखाडे हे 10 ते 15 हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. परंतु, त्यानंतर ग्रामसेवकावर कुठलीच कारवाई झाली नाही.
मूर्तिजापूर गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी यांना चौकशीसाठी पाठवले होते. परंतु, त्यांनी गावात येऊन ग्रामस्थांचा जबाब नोंदविला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच ग्रामस्थांसोबत विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांचे संगनमत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे निखिल वानखडे, जनार्धन वानखडे, सुभाष खंडारे, रवी मेश्राम, संजय वानखडे, दामोदर वानखडे, रवी तायडे यांच्यासह आदी ग्रामस्थ आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. दरम्यान, यासंदर्भात मूर्तिजापूर गटविकास अधिकारी ओ. टी. गाथेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.