अकोला - पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. शासकीय आस्थापनेवरील रिक्त किंवा कंत्राटी स्वरूपात असलेल्या जागेवर नियुक्ती देण्यात यावी, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने 2 मार्च 2019 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पदावर नियुक्त देण्याचे ठरविले आहे. मात्र, अद्यापही या परिपत्रकाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. तसेच पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती देताना वयाची अट न ठेवता थेट नियुक्ती देण्यात यावी, कर्मचाऱ्यांना सहाय्यक तलाठी, सहाय्यक लिपिक, सहाय्यक टंकलेखन या रिक्त जागेवर नियुक्त्या द्याव्यात, किमान वेतन कायद्यानुसार वेतन निश्चिती करण्यात यावी, बीएड, डीएड, बीपीएड धारक अंशकालीन कर्मचाऱ्यांना सहाय्यक शिक्षक सेवक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, या मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी आज धरणे आंदोलन सुरू केले.
हेही वाचा - पंकजा मुंडेंच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात; औरंगाबादमध्ये नेते-कार्यकर्ते दाखल
राज्य शासनाने मागण्या पूर्ण न केल्यामुळे या कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.