अकोला - शहरातील महादेवनगर येथील एका घरातून चोरट्यांनी सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरा दिवसात झालेली ही दुसरी घटना आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रमेश माणिकराव वानखेडे हे नागपूर येथे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. ते घरी परत आले असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह लॅपटॉप, देवाच्या चांदीच्या मुर्ती, दोन कॅमेरे असा चार लाखांपेक्षा जास्त किंमतीचा ऐवज लंपास केला आहे.
वानखेडे यांनी या घटनेची माहिती खदान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून श्वान पथकाच्या मदतीने चोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला.
यापुर्वी झालेल्या घटनेतील आरोपींना पकडले असून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, याच परिसरात पुन्हा चोरी झाल्याने चोरट्यांनी खदान पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.