अकोला - डाळीच्या सौद्यातील पैसे बुडवल्याप्रकरणी दालमिल संचालकांनी फेब्रुवारीमध्ये पोलिसांत तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. पोलिसांनी यामध्ये एकास अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
प्रकरण असे -
एमआयडीसी मधील नेहा पल्सेसची डाळ एका व्यापाऱ्याने 44 लाख 25 हजार 584 रुपयांत खरेदी करून एका आठवड्यात पैसे देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यापोटी तीन धनादेश दिले होते. परंतु, निर्धारित वेळ होऊनही व्यापाऱ्याने पैसे दिले नाही. व्यापाऱ्याने दिलेले ते तीन धनादेश बँकेत वटविण्यासाठी नेले असता, ते खातेच व्यापाऱ्याने बंद केल्याचे लक्षात आले. याची पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
दरम्यान, नेहा पल्सेसचे संचालक तुषार संतोष गोयंका यांच्याकडून अंकित कॅन्वासरर्सचे संचालक अंकित जगदीशकुमार पंचमिया यांनी याआधीही डाळ खरेदी केली आहे. त्यांच्यात बऱ्याचवेळा आर्थिक व्यवहार झालेला आहे.
हेही वाचा - आरटीआय कार्यकर्त्या अॅड. अंकिता शाह यांना पोलिसांची धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल
अंकित पंचमिया यांनी तुषार गोयंका यांना हरभरा डाळ खरेदीसाठी विश्वासू ग्राहक असल्याचे सांगितले. त्यांचा स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. या खरेदीदाराने डाळ खरेदी केल्यानंतर एका आठवड्यात पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले होते. तसेच, जर त्याने पैसे दिले नाही तर मी स्वतः माझ्याकडील रक्कम देईन, असे पंचमिया म्हणाले होते. त्यामुळे गोयंका यांनी पंचमिया यांच्या सांगण्यावरून हा व्यवहार केला.
पंचमिया यांनी 44 लाख 25 हजार 584 रुपयांची हरभरा डाळ खरेदी केली. त्यापोटी तीन धनादेश दिले. पहिला धनादेश 11 लाख 79 हजार 475, दूसरा 17 लाख आणि तिसरा धनादेश 15 लाख रुपयांचा दिला. जे धनादेश दिले ते बंद खात्याचे होते. त्यामुळे ते वटले नाही. याविरोधात गोयंका यांनी पोलीस तक्रार केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात पंचमिया यास अटक करून न्यायालयात हजर केले होते.
हेही वाचा - राजस्थानातील बनावट आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक