अकोला - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामूहिक भोजनातून १०० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना हिंगणी येथील भीमटेकडी येथे आज दुपारी घडली. त्या सर्वांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.
अकोट तालुक्यातील हिंगणी येथील भीमटेकडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठी गर्दी होते. हजारो नागरिक येथे आदरांजली वाहण्यासाठी येतात. त्यानंतर तिथे येणाऱ्यांना सामूहिक जेवण देण्यात येते. त्याप्रमाणे यंदाही सामूहिक जेवण देण्यात आले.
जेवण केल्यानंतर काही नागरिकांना उलटी, मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. यानंतर त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णांमध्ये लहान मुले, मुली आणि महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून या जेवणाचा त्रास नेमका किती जणांना झाला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.