अकोला : मृत व्यक्तीचे नाव शेख रज्जाक शेख गुलाब (वय ७० वर्षे, लक्ष्मी नगर, अकोट फैल) असे आहे. पातूर तालुक्यातील बेलूरा ते तांदळी फाट्यावर ताहीर अब्बाशी शकील अहमद यांचे बंदूकवाला नावाने फटाका केंद्र आहे. काम सुरू असताना मोठा स्फोट होऊन संपूर्ण खोली कोसळली. अपघातात फटाका केंद्रातील एका मजुराला जागीच प्राण गमवावे लागले. फटाका कारखान्यातील स्फोट नेमका वाढत्या उन्हामुळे झाला की निष्काळजीपणामुळे? याचा तपास पातूर पोलीस करीत आहे.
ही आहेत जखमींची नावे : शेख रज्जाक शेख गुलाब असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर पाच मजूर जखमी झाले आहेत. यामधील एक मजूर गंभीर जखमी आहे. या सर्व जखमी मजुरांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये सुरेश नामदेव दामोदर (वय ५०, रा. तांदळी), धम्मपाल सिताराम खंडेराव (वय ३६, रा. तांदळी), महेश किसन खंडेराव (वय ३२, रा. तांदळी), रीना मंगेश खंडेराव (वय ३०, रा. तांदळी) असे जखमींची नावे आहेत.
स्फोटाचे कारण अज्ञात: स्फोटामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या भीषण स्फोटात मोठ्या प्रमाणात फटाके जळून राख झाले. याची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. भिंतीचे तुकडे जवळपास दोनशे मीटर दूरवर उडाले. अपघाताची माहिती मिळताच पातुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या आणि घटनेचा पंचनामा केला.
दूर असल्याने वाचले प्राण: फॅक्ट्रीत काम करण्यासाठी ३५ मजूर आले होते. यापैकी काही मजूर जेवण करण्यासाठी अर्धा किमी अंतरावर गेले होते. मजूर जेवायला बसणार इतक्यातच फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट झाला. हे सर्व मजूर घटनास्थळापासून दूर असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मजूर जेवणाला गेल्याने जखमींचा आकडा कमी झाला.