अकोला - एमआयडीसी फेज क्रमांक चारमध्ये असलेल्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांना आज आग लागली. अक्षय केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत कमी नुकसान झाले आहे. मात्र, श्री पॅकेजिंग इंडस्ट्रीजला मोठी आग लागली असून, ही आग विझवण्यासाठी सहा अग्निशमन दलाचे बंब कामी आले आहेत. लाखोंचे नुकसान झाले असले तरी कुठलीही जीवितहानी झाली नाही.
एमआयडीसी फेज क्रमांक चारमध्ये दुपारी अक्षय केमिकल कंपनीला आग लागली. या आगीत रिकामे प्लास्टिक ड्रम जळाले आहे. दुसरी मोठी हानी झाली नाही. ही आग विझविण्यासाठी एक अग्निशमन दलाचा बंब कामी आला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होवू शकले नाही.
श्री पॅकेजिंग इंडस्ट्रीजला लागली मोठी आग
एमआयडीसी फेज क्रमांक चारमधील श्री पॅकेजिंग इंडस्ट्रीजला सायंकाळी आग लागली. या आगीत कंपनीमध्ये ठेवलेले पुठ्ठे जळाले आहेत. आग लागल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत धरून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सहा बंब आग विझविण्यासाठी लागले आहे. तरीही आग धुसफूस सुरूच होती. या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.
दोन्ही आगीत जीवितहानी नाही
अक्षय कंपनीमध्ये लागलेल्या किरकोळ आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर श्री पॅकेजिंग इंडस्ट्रीज मध्ये लागलेल्या भयंकर आगीतही कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.