अकोला - संचारबंदीच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहकांकडे असलेल्या वीज मीटरचे रीडिंग घेण्यात आले नाही आणि वीज देयकही देण्यात आलेले नाही. देयके कशी भरावी, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. ही स्थिती अकोला, बुलढाणा, वाशिम या तीन जिल्ह्यात आहे. त्यामुळे कंपनीची अकोला विभागात तब्बल 70 ते 80 कोटींची मागणी पूर्ण झालेली नाही.
ग्राहकांसाठी कंपनीने ऑनलाईन सेवा उपलब्ध केली होती. या सेवेचा लाभ घेत 30 टक्केच ग्राहकांनी बिल भरले. त्यामुळे कंपनीच्या मागणीमध्ये मोठी घट झाल्याने ग्राहकांनी कंपनीला आर्थिक 'करंट'च दिला आहे. ग्राहकांच्या करंट मुळे कंपनीला दर महिन्यात कोट्यवधीचा फटका बसला आहे.
हेही वाचा... राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरीच; जूनअखेरपर्यंत होणार खरेदी..
संचारबंदीच्या काळात वीज वितरण कंपनीने मीटर बिल घेणे बंद केले. त्यामुळे घरपोच देयके देणे ही बंद केले. तसेच देयक स्विकारणे बंद झाले होते. जे ग्राहक ऑनलाईन पध्दतीने देयक भरू शकत होते, त्यांनी या सेवेचा लाभ घेतला. संचारबंदीचा फटका कंपनीच्या आर्थिक स्थितीवर पडला आहे. 90 ते 95 टक्के ग्राहकांनी स्वतः बिल भरण्यास टाळले. कंपनीकडून ऑनलाईन सेवा, अॅपचा प्रचार झाला. 30 टक्के ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला. त्यामुळे कंपनीच्या मागणीला गेल्या दोन महिन्यापासून ग्राहकांचा अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मार्च महिन्यात कंपनी उरलेले आपले टार्गेट पूर्ण करते. ती संधी यावेळी मिळालीच नाही. त्यानंतर एप्रिल, मे आणि आता जून महिन्यात कंपनीची दरवर्षीची जी मागणी असते, ती पूर्ण न झाल्याने कंपनीला दर महिन्याला 70 ते 80 टक्के आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
विशेष म्हणजे, यावर उपाय म्हणून, कंपनीने ग्राहकांचे आधीच्या तीन महिन्यांचे बिलाची सरासरी काढून त्यांना बिल आकारले आहे. उन्हाळ्यात विजेचा वापर जास्त असला तरी सरासरी बिल आकारणीमुळे ग्राहकांचाच फायदा झाला आहे. तरीही ग्राहकांनी देयक भरलेले नाही. ग्राहकांमध्ये देयक भरताना संभ्रम निर्माण होत आहे. परंतु, ज्या ग्राहकांना सेवेबद्दल किंवा देयकाबाबत भीती वाटत असेल त्यांनी त्या उपविभागीय अधिकाऱ्याना भेटून आपली अडचण दूर करण्याची संधी कंपनीने दिली आहे. तसेच सरासरी आलेल्या बिलात हप्ते पाडून देण्याची मुभा ही ग्राहकांना मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांनी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.