अकोला - देशामध्ये प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्याच्या लागवडीच्या संदर्भामध्ये शेतकरी संघटनानी यावर्षीपासून पुन्हा पुढाकार घेतला आहे. प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे शेतकऱ्यांनी लावावे आणि त्यातून भरघोस उत्पन्न घ्यावे, या उद्देशाने शेतकरी संघटना 2019 पासून सक्रिय झाली आहे. 'किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह' या ब्रीद वाक्य खाली शेतकरी संघटनेने आज आडगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एचटीबीटीची लागवड करून या सप्ताहाचे उद्घाटन केले.
देशात प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी कापूस लागवडीच्या बियाण्याला केंद्र सरकारने परवानगी देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करावी तसेच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे श्रम कमी करून भरघोस उत्पन्न वाढावे या उद्देशाने एसटीबीटी बियाण्याला शेतकरी संघटना पुरस्कृत करीत आहेत. मात्र, सरकारकडून याबाबत विरोध आहे. त्याच विरोधाला झुगारून अकोट येथील शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे यांच्या नेतृत्वामध्ये आडगाव खुर्द येथील देऊळकर यांच्या शेतात एचटीबीटी पेरणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
शेतकऱ्यांनी एचटीबीटी पेरावी, यासाठी शेतकरी संघटना सरसावली आहे. मोजक्याच शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एचटीबीटी बियाण्यांच्या संदर्भात सविनय कायदेभंग आंदोलन करून या आंदोलनाचे फलकाचे उद्घाटन शेतकरी नेते ललीत बहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. आठवडाभर प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि एचटीबीटी बियाण्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शेतकरी संघटना कायदेभंग करीत प्रतिबंधित एचटीबीटी लागवडीसाठी संपूर्ण जिल्हाभर फिरणार आहे.
विशेष म्हणजे, 2019 पासून सुरू झालेल्या किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रहाला आता मोठे स्वरूप प्राप्त होत आहे. त्याच माध्यमातून शेतकऱ्यांनी एसटीबीटी लावण्यासाठी किंवा त्यांना प्रतिबंधित एसटीबीटी मिळावी, यासाठी टेलिफोनिक माहिती केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. जनुकीय बदल झालेले बियाणे शेतकऱ्यांना हवे असेल तर त्या शेतकऱ्यांनी टेलिफोनिक माहिती केंद्रावर संपर्क साधल्यास शेतकरी संघटना त्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करेल, असे आश्वासन शेतकरी नेते ललित बाळ यांनी दिले आहे.
शेतकरी संघटनेने कोरोना संसर्ग प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करीत सविनय कायदेभंग आंदोलनाच्या फलकाचे उद्घाटन केले. आडगाव खुर्द येथील देऊळकर यांच्या शेतात हा कार्यक्रम घेण्यात आला. शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याने यामध्ये कुठलीही कारवाई झाली नाही, अशी माहिती अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी दिली.