अकोला - घरचे सोयाबीन बियाणे विकून एक शेतकरी कोट्यधीश झाला, यावर कोणालाच विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. या शेतकऱ्याने बड्या कंपन्यांना टक्कर दिली असून शेतकऱ्यांसाठी शेतीतील एक नवा जोडधंदा शोधून काढला आहे. हे शेतकरी आहेत. बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा गावातील मोहन देशमुख. विशेष म्हणजे, त्यांचे सोयाबीन बियाणे हे बड्या कंपनीनेही मागितले होते. परंतु, त्यांनी ते त्यांना न विकता स्वतः शेतकऱ्यांना विक्री करत कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवला आहे.
सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता 80 टक्के -
बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा या गावातील मोहन देशमुख यांच्याकडे शंभर एकर शेती आहे. ते व त्यांचे भाऊ मिळून ही शेती करतात. ते दरवर्षी घरचेच सोयाबीन बियाणे पेरतात. मागील वर्षी त्यांनी संपूर्ण सोयाबीन बियाणे पेरले होते. त्यामध्ये त्यांना हजार क्विंटल सोयाबीन झाले. भाव वाढतील या आशेने त्यांनी ते ठेवून दिले. त्यानंतर कृषी विभागाच्या मदतीने त्यांनी हे सोयाबीन, बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विकले. त्यांनी जर हे बियाणे बाजारात विकले असते तर त्यांना 40 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न झाले असते. परंतु, त्यांनी सोयाबीन, बियाणे म्हणून विकल्याने त्यांनी आत्ताच 700 क्विंटल विकून एक कोटी रुपये उत्पन्न घेतले आहे. ते यातून आणखी वीस लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न 300 क्विंटल सोयाबीन बियाणे विकून घेणार आहेत. त्यांच्याकडे असलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ही 80 टक्के आहे. शेतकऱ्यांना ती ते उगवण क्षमता दाखवुनच विकतात. खासगी कंपनीच्या किंवा इतर कंपनीच्या बियाण्यांची उगवण क्षमता एवढी येत नाही.
बियाणे झाले होते खराब -
मागील वर्षी सोयाबीनवर रोग आणि काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे सोयाबीन खराब झाले होते. हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी हे सोयाबीन तीन ते चार हजार रुपयांच्या आत विकले. परिणामी, ज्या शेतकऱ्यांकडे चांगले सोयाबीन होते. त्यांनी ते भाव वाढेल म्हणून ठेवून दिले होते.
सोयाबीनला मिळाला विक्रमी भाव-
सोयाबीनला सुरुवातीला कमी भाव मिळाला. नंतर भाव वाढत गेला. सोयाबीनचा भाव बाजारात सात हजार 800 रुपये प्रति क्विंटल गेला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनि सोयाबीन विकून चांगलाच फायदा करून घेतला. सोयाबीनला इतका जास्त भाव कधीच मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घरातील होते नव्हते ते सर्व सोयाबीन बाजारात विकले. बिजवाई पण शेतकऱ्यांनी विकली. शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध राहिले नाही.
सोयाबीन बियाण्यांचा बाजारात तुटवडा -
सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांकडे सोयाबीन बियाणे नाही. तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्याकडेही मोजकेच बियाणे होते. तर खासगी कंपनीच्या सोयाबीनला शेतकऱ्यांनि पसंती दिली नाही. त्यामुळे बाजारात सोयाबीन बियाणे मिळणे कठीण झाले होते.
बड्या कंपनीने मागितले होते देशमुख यांना बियाणे -
मोहन देशमुख यांच्याकडे असलेल्या सोयाबीनला बड्या कंपनीने मागणी केली होती. परंतु, त्यांनी ते बियाणे विकले नाही. जादा भावाने त्यांच्याकडे बियाणे खरेदीसाठी कंपनी तयार झाली होती. तरीही त्यांनी बियाणे कंपनीला विकले नाही.
कृषी विभागाने करून दिला फायदा -
मोहन देशमुख यांच्याकडे भरपूर सोयाबीन बियाणे आहे, अशी माहिती कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी यांना मिळाली. त्यांनी देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी बियाणे विक्रीचे गणित त्यांना समजावून सांगितले. तसेच यातून तुम्हाला दरवर्षी होणारा फायदा तो बियाणे म्हणून विकल्यास दुप्पट जाईल, असेही समजून सांगितले. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना हे बियाणे शेतकऱ्यांना विकल्यास काय फायदा होईल याची माहिती दिली.
इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेले बियाणे -
देशमुख यांनी सोयाबीन बियाणे घरीच ठेवून ते शेतकऱ्यांना विकले. शंभर रुपये ते 120 रुपये प्रति किलो बियाणे त्यांनी शेतकऱ्यांना विकले. गरीब शेतकऱ्यांना तर त्यांनी 90 रुपये प्रति किलोने सोयाबीन बियाणे विकले आहे. शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीचे बियाणे साडेतीन ते चार हजार रुपये बॅगने बियाणे बाजारात भेटले असते. परंतु, देशमुख यांनी त्यांच्याकडील सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रति बॅगने विकले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा व त्यांचा ही फायदा झाला. बाजारात घरचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना भेटले नाही. परंतु, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना घरचे सोयाबीन बियाणे भेटले. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून बियाणे खरेदी केले आहे.
हेही वाचा -अहमदनगर - जिरेनियम शेतीतून तीन महिन्यात दोन एकर शेतीत दोन लाखाचे घेतले उत्पन्न