अकोला - जठार पेठ परिसरात असलेल्या एमजीआर या देशी व विदेशी दारूच्या दुकानात तसेच दुकानावर गोदामातून अवैधरित्या साठवणूक केलेला 49 लाख 81 हजार रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन दिवस चाललेल्या कारवाईनंतर जप्त केला. आरोपी सचिन महादेव राऊत न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ यांना माहिती विचारली असता त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली.
जठार पेठ परिसरातील रहिवाशी सचिन राऊत याच्या मालकीचे एमजीआर देशी व विदेशी दारुचे दुकान आहे. या दुकानाच्या परिसरात दोन ट्रक देशी-विदेशी दारुचा साठा करण्यात आल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. दारूच्या साठा मोजणी झाल्यानंतर 49 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे समोर आला. सचिन राऊत याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईबाबत मौन पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कारवाईची माहिती घेण्यासाठी अधीक्षक स्नेहा सराफ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती थोड्यावेळाने देते, असे सांगून टाळले. त्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
विशेष म्हणजे, ज्यावेळी ही कारवाई सुरू होती, त्यावेळी काही अधिकारी या करवाईतून शॉप मालकास वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई परवानगी नसलेल्या ठिकाणी दारू साठा साठवून ठेवल्याचा कारणावरून करण्यात आली आहे. ज्या जागेची परवानगीच नाही, त्या जागेवरील दारू साठा हा अवैधच आहे, असे अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, या कारवाई बाबत मौन पाळण्यात येत असल्याने नेमकी कोणती कारवाई अबकारी विभागाने केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.