अकोला - घरातील विद्युत पुरवठा बंद पडल्यामुळे दुरुस्त करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या इलेक्ट्रिशनने त्याच्या मित्राच्या सहाय्याने कपाटामधील अडीच लाख रुपयांचे 42.7 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी तीन तासाच्या आत इलेक्ट्रिशियन व त्याच्या मित्राला मुद्देमालासह अटक केली. इलेक्ट्रिशन सतीश चावला व त्याचा मित्र विजय चंदानी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सिंधी कॅम्पमधील नरेश सचवाणी यांच्या घरातील विद्युत पुरवठा बंद पडल्याने त्यांनी इलेक्ट्रिशियन सतीश चावला याला दुरुस्त करण्यासाठी बोलाविले होते. नरेश सचवानी यांची पत्नी ही माहेरून आल्यानंतर तिने दागिन्यांची पर्स कपाटात ठेवली. सतीश चावला याने अर्धवट काम केल्यानंतर त्याच्या मित्राला घेऊन येतो, असे म्हणत कपाटातील दागिन्यांची पर्स घेऊन निघून गेला. थोड्यावेळाने सतीश व त्याचा मित्र विजय चंदानी हे दोघे परत आले. घरातील विद्युत पुरवठा सुरू करून ते निघून गेले.
हेही वाचा-घसरणीचा फटका; दोन दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांचे ७ लाख कोटी पाण्यात!
काही वेळानंतर नरेश यांच्या पत्नीने कपाटातील दागिन्यांची पर्स तपासली. मात्र, ती कपाटात मिळून न आल्याने त्यांनी थेट खदान पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांनी सतीश चावला व विजय चंदानी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच या दोघांनी चोरी केल्याचे कबूल केले. अवघ्या तीन तासाच्या आत खदान पोलिसांनी या दोघांना अटक करून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा-अंबानींना धमकी देणाऱ्या 'त्या' पत्राची प्रिंट शिंदेंच्या प्रिंटरमधून, वाझेंची कबुली
आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह-
चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एक जण हा पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. तर त्याचा दुसरा साथीदार याला न्यायालयात हजर केले आहे.