अकोला - नव व्यावसायिकांना आवश्यक असलेली बाजारपेठ व त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जिल्हा नाविन्यता परिषदेचे आयोजन हे उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज केले. यामुळे देशालाही नवी दिशा मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहामध्ये आयोजित स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या उपक्रमामुळे नवीन बाजारपेठ आणि नवीन व्यावसायिक तयार होत आहेत. त्यांनी तयार केलेले नव तंत्रज्ञान हे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे देशातील युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा सर्वांनी फायदा घेऊन आपले यश साध्य करावे, असेही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यावेळी म्हणाले.
डॉ. पाटील व इतर मान्यवरांनी सभागृहाच्या बाहेरील दालनात व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देत त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले महिलांसाठीचे उत्पादन, भुईमुग फोडण्यासाठी तयार असलेले यंत्र, सोलरवर चालणारे कुलरचे यंत्र, गजानन निलखन यांनी वन्य प्राण्यांना शेतातून तयार केलेले यंत्र, पेन्सिलच्या तुकड्यांचा उपयोगाचे प्रात्यक्षिक याची माहिती त्यांनी घेतली.
या स्टार्टअपच्या कार्यक्रमात ६० नवोदित व्यावसायिकांनी नोंदणी करून त्यांच्या या कल्पनांनी तयार करण्यात आलेल्या व्यवसायांचे चित्रीकरण यावेळी दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एम. भाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह काही व्यवसाय तसेच नागरिक उपस्थित होते.