अकोला - कोरोनाबाधित मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेवर ज्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथील डॉक्टर व पाच कर्मचाऱ्यांना क़्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच हा दवाखानाही प्रशासनाने सील केला आहे. या खासगी रुग्णालयात इतर कुठले रुग्ण नसल्यामुळे मोठी हानी टळली असल्याचे बोलले जात आहे.
बैदपुरा या परिसरातील एक महिला जयहिंद चौकातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. तेथील डॉक्टरांना शंका आल्यामुळे त्या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. काही वेळातच उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
या घटनेनंतर मनपा प्रशासनाने खासगी डॉक्टर व तेथे काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. तसेच या खासगी रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. हा दवाखानाही प्रशासनाकडून आता सील करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या दवाखान्यात इतर रुग्ण नसल्यामुळे त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचे टळले आहे. जर या रुग्णालयात इतर रुग्ण असते तर अकोल्याच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.