अकोला - परिवहन मंत्री दिवाकर रावते अकोला तालुक्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पंचनामे न करताच भरपाई देण्याची मागणी केली. यावर रावते यांच्या आदेशानुसार पोलिसांनी त्या नेत्यांना बाजूला सारत रस्ता दाखविला. मात्र, शेतकऱ्यांनी केलेल्या प्रश्नाबाबत रावतेंनी चुप्पी साधली.
हेही वाचा- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
परिवहन मंत्री दिवाकर रावते हे अकोला येथील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. आपातापा, पलसोबढे, दहीगाव गावनडे येथे रावते यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी नेते कृष्णा अंधारे, मनोज तायडे यांनी नुकसान भरपाई बाबत शासनाची कुठलीच मदत होत नसल्याचा आरोप केला. सातबारा कोरा करा, एकरी 25 हजार मदत द्या अशी मागणी शेतकरी नेत्यांनी रावते यांच्याकडे केली. या नेत्यांचा रोष पाहता दिवाकर रावते यांनी हे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते आहेत म्हणताच पोलिसांना या शेतकरी नेत्यांना बाजूला केले.
त्यानंतर रावते यांच्याकडे शेतकऱ्यांनी शासनाच्या नुकसानभरपाई संदर्भात होत असलेल्या दिरंगाई बाबत जाब विचारला. पंचनामे होत नसल्याचे सांगीतले. तलाठी व महसूल अधिकारी यांनी शेतीची पाहणी केली नसल्याचे सांगीतले. विमा कंपन्यांचे अर्ज भरण्यासाठी वेळ वाढून देण्याची मागणी केली. मात्र, रावते याबाबत काहीच बोलले नाही. त्यांच्याऐवजी तहसीलदार विजय लोखंडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.