अकोला - कांद्याचे भाव नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारने आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व्यावसायिकांकडे कांदा साठवणुकीची पाहणी केली. 'ईटीव्ही भारत'ने ६ डिसेंबरला जिल्हा पुरवठा विभाग कारवाई करणार का? असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने कांदा व्यावसायिकांची तपासणी केली.
कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सरकारने कांदा साठवणुकीची तपासणी करण्यासंदर्भात निर्णय घेतला. तसे आदेश काढून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कांदा साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील कांदा व्यापारी व अडते यांच्या गोदामाची पाहणी केली. यावेळी पथकाने ३ गोदामांची पाहणी करत व्यापाऱ्यांसोबत कांदा आवक आणि जावक बाबतच्या नोंदी देखील तपासल्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांच्यासह अन्नधान्य वितरण अधिकारी प्रतीक्षा तेजनकर, पुरवठा निरीक्षक येन्नावार, वाहनचालक योगेश वाकळे आदी उपस्थित होते.