अकोला - अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी काल दिली. विशेष म्हणजे, हा रुग्ण 29 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याचा रिपोर्ट दिल्ली येथे डेल्टा प्लसच्या चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक पोस्ट केल्याने गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी
हा रुग्ण कोरोना निगेटिव्ह होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरीही त्याचा डेल्टा प्लस पॉझिटिव्ह रिपोर्ट तब्बल एक महिन्यानंतर आल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोग्य पथकाची चमू त्याच्या घरी चौकशीसाठी गेली होती. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झाली असली तरी डेल्टा प्लसचा धोका आहे. दिल्ली येथे डेल्टा प्लसचे निदान होते. तेथून आलेल्या अहवालाची माहिती थेट राज्य सरकारला दिली जाते. त्यानंतर ती माहिती गोपनीय ठेवत जिल्ह्यातील पथकाला दिली जाते. या पथकाला मिळालेल्या माहितीवरून अकोट तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले आहे.
रुग्ण 29 जून रोजीच कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उपचारही झाले. त्याचवेळी त्याच्या घरातील इतरही नातेवाईक पॉझिटिव्ह आले होते. तेही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, एक महिन्यानंतर डेल्टा प्लसचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी हा रुग्ण आजच्या घडीला पूर्णपणे बरा झाला असून तो शेतात जात असून कामही करीत आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाचे पथक अकोट येथे रुग्णाच्या संपर्कात असलेल्या नागरिकांचे नमुने घेणार आहे. त्यामुळे, कोरोना रुग्णांसोबत डेल्टा प्लस रुग्णांचीही वाढ झाला किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार आहे.
अहवाल यायला दहा दिवस लागतात
दिल्लीला डेल्टा प्लसचे निदान होते. दहा दिवसांत डेल्टा प्लस पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अहवाल प्रत्येक जिल्ह्याला दिला जातो. त्या अहवालातून डेल्टा प्लसचा रुग्ण पॉझिटिव्ह आहे किंवा नाही, हे कळते.
हेही वाचा - 'नाही तं वं आज माहेरास येणारंच नाही' विठ्ठल वाघांच्या कवितेने रानभाजी महोत्सव 'चवदार'