अकोला - जिल्ह्यातील बाळापूर शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बच्चू कडूंनी यांच्या सूचनेनुसार बाळापुरात आजपासून (शनिवार) पुढील पाच दिवस संचारबंदी करण्यात येणार आहे.
बाळापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण आठ दिवसांपासून वाढु लागले आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 इतकी झाली आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता बुधवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी आढावा बैठक घेतली होती.
हेही वाचा - VIDEO : महिला सरपंचाने घेतला 'दुर्गा' अवतार... दारू विक्रेत्याची केली धुलाई
बैठकीत बाळापूर शहर पाच दिवस बंद ठेवण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी तालुका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने 25 जूनपर्यंत बाळापूर शहर पुर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये दवाखाने, औषधालये, कृषी केंद्र आणि दुध विक्रीला वगळण्यात आले आहे. तसेच गर्दी होऊ नये, म्हणून शहराच्या विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदला शहरवासियांचा प्रतिसाद मिळत आहे.