अकोला - परतीच्या पावसामुळे 3 लाख 9 हजार 341 शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 297 कोटी 94 लाख 30 हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून 72 कोटी 55 लाख 77 हजार रुपयांचा मदत निधी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी प्राप्त झाला आहे.
हेही वाचा - विशेष पथकाची बाळापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई; दीड लाखांचा ऐवज जप्त
पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात खरीप पिकांचे बागायती व फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील 104 गावांमध्ये 3 लाख 9 हजार 341 शेतकऱ्यांचे 3 लाख 69 हजार 719 सेक्टर 25 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी 16 नोव्हेंबरला मदत जाहीर झाली होती. त्यानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांचे नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 18 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा - VIDEO : अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट; जीवितहानी नाही
त्या अनुषंगाने मदत देण्यासाठी 297 कोटी 94 लाख 30 हजार रुपये मदत निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारकडे करण्यात आली होती. शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याचा पहिला टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 72 कोटी 55 लाख 77 हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत 19 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. उपलब्ध मदतनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात येत असून तसे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.