अकोला - बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल सात हजारांच्या वर तुरीचे भाव गेले होते. तुरीच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात चमक निर्माण झाली होती. परंतु, तुरीचे भाव अचानकपणे सहा हजारांच्या जवळ आल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. हे भाव आणखी कोसळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. शेतात उभे असलेले तुरीचे खोंडके काढण्यासाठी 600 रुपये प्रति एकर मजुरी द्यावी लागत असल्यामुळे तुरीचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना आता ही मजुरीही देणे परवडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तूर जर सहा हजाराच्या जवळपास विकली तर मजुरीला पैसे द्यावे की पुढील हंगामासाठी पैसे वाचवावे, असे संकट आता शेतकऱ्यां समोर निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांची पांढरे सोने ही मातीमोल
यावर्षी शेतकऱ्यांना अस्मानी संकटाने ग्रासले आहे. सोयाबीन शेतात पूर्णपणे खराब झाला होता. त्यानंतर कपाशी ने शेतकऱ्यांना आशा दाखवली होती. परंतु, त्यावरही बोंडआळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची पांढरे सोने ही मातीमोल झाले. अशातच अवकाळी पावसाने ही उरलेल्या पिकांवर विषारी औषधांसारखा फवारा मारून ते पीकही खराब करून टाकले. या सर्व बाबींची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तुरीच्या भावाने मात्र आशा दाखवली.
तुरीच्या दरात घसरण
ज्यावेळी शेतकऱ्यांची तूर काढल्या जात होती त्यावेळी बाजार समितीमध्ये तुरीला सात हजार रुपयांच्या वर प्रतिक्विंटल भाव होता. जेव्हा शेतकर्यांनी तूर बाजारात आणली. त्यावेळेपासून तुरीच्या दरात घसरण सुरू झाली. ही घसरण आता सहा हजारावर येऊन ठेपली आहे. तुरीचे भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांसमोर परत आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचा नफा खाऊन टाकला असल्याची स्थिती निर्माण झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तूर विकण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही
शेतकर्यांनी तूर काढण्यासाठी पण मजुरांना पैसे मोजले. शेतात उभी असलेली तुरीची रोपे काढण्यासाठी पण शेतकऱ्यांनी पैसे मजुरांना दिले. मात्र, आता शेतात उभे असलेले तुरीचे खोंडके काढण्यासाठी परत मजुरांना सहाशे रुपये प्रति एकरने शेतकऱ्यांना भाव द्यावे लागत आहेत. त्यामुळे सहा हजार रुपये दराने जर तुर विकली तर शेतकऱ्यांना या पिकातून नफा होणार नाही आहे. त्यामुळे शेतकरी आता तूर विकण्याच्या मनस्थितीत नाही आहे.केंद्र सरकारने तूर आयात केल्यामुळे तुरीचे दर कोसळले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, दर जरी कोसळले असले तरी यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. परिणामी, हे दर परत खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.