अकोला - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाजवळ तपासणीची सोय आणि संशयित रुग्ण असलेल्यांसाठी 'क्वारन्टाईन वॉर्ड' तयार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात हा वॉर्ड बनवला आहे. मात्र, या वॉर्डला पहिल्याच दिवशी कुलुप असून येथे कोणीही वैद्यकीय अधिकारी किंवा इतर कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले आहे. यावरून अकोल्यातील आरोग्य विभाग किती दक्ष आहे, हे दिसत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यभरात नव्हे तर, देशभरात आरोग्य विभागाकडून सतर्कता दाखवली जात आहे. विदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होत आहे. या नागरिकांपासून देशातील इतर नागरिकांना या विषाणूची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या विभागाकडून शासकीय रुग्णालयांमध्ये 'आयसोलेशन वॉर्ड' तयार करण्यात आले आहेत. दरम्यान संशयित असलेल्यांसाठी किंवा देखरेखीसाठी 'क्वारन्टाईन वॉर्ड' ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात असलेल्या आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. तसेच, रेल्वे स्थानकाजवळ तपासणीची सोय आणि संशयित रुग्ण असलेल्यांसाठी 'क्वारन्टाईन वॉर्ड' तयार केला आहे. या वॉर्डमध्ये आयसोलेशन वॉर्ड सारखीच व्यवस्था उभी करण्यात आली असली तरीही, वैद्यकीय अधिकारी, इतर वैद्यकीय साहित्य येथे पोहोचले नसल्याचे समजते. येथे वॉर्ड सुरू झाल्याच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच पहिल्या दिवशीच गैरहजर होते. त्यामुळे आरोग्य विभाग या विषाणूच्या बाबत किती सतर्क आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान यांच्याशी संपर्क साधला असता, येथे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले असून ते दुपारी कर्तव्यावर येतील, असे ते म्हणाले.
हेही वाचा - CORONA VIRUS : शहरांमधील सर्व शाळा, महाविद्यालये, मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद
हेही वाचा - Coronavirus : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत आढळले आणखी 4 रुग्ण