अकोला - राज्यात कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यंत साडेतीन हजाराच्यावर रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर अकोला जिल्ह्यातील दररोज एकाचा बळी जात असून आतापर्यंत 46 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्यातील मृतांची संख्या कमी असली, तरी येथील मृत्यूचा दर राज्याच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासाही मिळत आहे. पण यासोबतच कोरोनामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. राज्यात गुरुवार 11 जूनपर्यंत 3 हजार 289 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यानुसार राज्यातील मृत्यूदर हा 3.6 एवढा आहे. मात्र, या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर 4.7 असा आहे. जिल्ह्याचा हा मृत्यूदर राज्याच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, येथे दररोज एकाचा बळी जात असल्याने जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच आवश्यक पावले न उचलल्यास जिल्ह्याची परिस्थिती आणखीनच भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.