अकोला - लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू असतानाच अकोल्यातून भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. परंतु, अद्यापही काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे नाव जाहीर न झाल्याने भाजपच्या उमेदवाराला कोण टक्कर देईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी भाजपला चांगली टक्कर दिली होती. लोकसभा निवडणुकीचे नाम निर्देशन पत्र भरण्याची २६ तारीख ही शेवटची आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप, सेना व काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रयत्न केले. त्यामध्ये ते अपयशी ठरले. वंचित बहुजन आघाडी आता स्वबळावर लोकसभेला सामोरे जाणार आहे. वंचित बहुजन आघाडी राज्यातील ४८ लोकसभा निवडणुकीच्या मतदार संघातील ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित ११ उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही.
भाजपने धुलिवंदनाच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामधून अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी भाजप उमेदवार बदलणार अशी चर्चा होती. परंतु, त्या चर्चेला आता विराम लागला आहे.
दरम्यान, भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे नाव जाहीर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार जाहीर न झाल्याने त्यांच्या कार्यालयात शुकशुकाटच आहे.
मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय धोत्रे होते. काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर हे होते. नेहमी प्रकाश आंबेडकर हे भाजपला टक्कर देत होते. परंतु मागील निवडणुकीत काँग्रेससोबत त्यांची आघाडी न झाल्याने त्यांना मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. यावेळीही त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी न झाल्याने हा पक्ष परत तिसऱ्या क्रमांकावर जाईल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.
जर काँग्रेसने मराठा कार्ड खेळले तर भाजपच्या उमेदवारास टक्कर देता येईल. जर मुस्लिम उमेदवार दिल्यास वंचित बहुजन आघाडीसोबत आलेल्या एमआयएमच्या मतदारांमध्ये सभ्रम होण्याची शक्यता आहे.