अकोला - केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यकाळाचा काँग्रेसने आंदोलन करत निषेध केला आहे. अकोला येथीव राजभवन येथे काँग्रेसने केंद्र सरकाचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली. तसेच, केंद्राने देशवासियांना या 7 वर्षात महागाई भेट दिली असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली आहे.
'देशाची अर्थव्यवस्था कोलमडली'
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तसेच 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेला अच्छे दिन आणि विकासाची खोटी स्वप्ने दाखवत मोदी सत्तेवर आले. मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहेत. पण, या 7 वर्षाच्या कालावधीत जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आला नाही', असा आरोप यावेळी बबनराव चौधरी यांनी केला आहे.
'कोरोनावर अंकुश बसवण्यात केंद्र सरकार अपयशी'
'कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहार कमी झाले आहेत. मजुरांना काम मिळत नाही. नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार महागाई वाढवत आहे. इंधन दरवाढ करून या सरकारने सर्वच वस्तूंचे दर वाढवले आहेत. त्यासोबतच कोरोनावर अंकुश बसविण्यात हे केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यात लसीकरण मोहिमही थंडावली आहे. देशातील लसीकरण पूर्ण करण्याऐवजी केंद्र सरकारने विदेशात लस पाठवून देशवासियांना कोरोनाच्या सावटात लोटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची ही 7 वर्षे साडेसातीसारखी आहेत', असेही बबनराव चौधरी यांनी म्हटले आहे. यावेळी माजी मंत्री अझहर हुसेन, मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, प्रदीप वखारीया, हेमंत देशमुख, कपिल रावदेव यांच्यासह आदी उपस्थित होते.
हेही वाचा - तोतया पोलीस बनून लुटणाऱ्याला अटक, रतन टाटांशी संबंध असल्याच्या मारत होता थापा