अकोला - उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये अकोला फारच उष्ण असतो. उन्हाळ्यात अकोलेकर कडक उन्हाचा त्रास आणि चटके यामुळे त्रस्त होऊन जातात. त्यामुळे उन्हाळ्यात अकोल्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणे हा फारच दुर्मिळ योग आहे.
विशेष म्हणजे, हवामान खात्याने दर्शविलेला अंदाजही अकोलेकरांसाठी दर उन्हाळ्यात खोटाच ठरतो. त्यामुळे त्यांच्यासाठी दररोजची पहाट ही उष्ण वातावरणाने उगवते. मात्र, आजची पहाट ही ढगाळ वातावरणाने उजळल्याने पहाटे पहाटे उठून सूर्याकडे पाहणाऱ्यांनाही आश्चर्यचकित करून गेली. गेल्या आठ दिवसांचे हवामान पाहिले तर अकोल्याचे किमान तापमान २७ अंशाच्या वर गेले आहे. रविवारी अकोल्याचे तापमान हे ४४.८ अंश होते.
मे महिना येण्याआधीच अकोल्याचा पारा ४५ अंशाजवळ पोहोचलेला आहे. असे असतानाही आज मात्र अकोल्याची पहाट ढगाळ वातावरणाने उगवली. या वातावरणाने अकोलेकरांना आश्चर्यचकित केले असले तरी हे ढगाळ वातावरण किती काळ राहील, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. पहाटे ढगाळ वातावरण आणि दुपारी गरम उन्हाचे चटके असाही वातावरणाचा रुबाब राहू शकतो, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.