अकोला - अकोला हा उन्हाळ्यात सर्वात उष्ण असतो. अशा परिस्थितीमध्ये महावितरणकडून जिल्ह्यात भारनियमन करण्यात येत आहे. हे भारनियमन वेळापत्रकानुसार न करता अघोषित करण्यात येत असल्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना या भारनियमनाचा त्रास होत आहे. त्यामुळे हे अघोषित भारनियमन बंद करावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
उर्जा मंत्र्यांनी केला होता दावा - राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा तुटवडा ( Power Shortage In Maharashtra ) जाणवत होता. मात्र आजची परिस्थिती पाहता राज्यात कुठेही भारनियमन ( No Load Shedding In Maharashtra ) नाही, असा दावा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांनी ईटीव्ही भारतच्या विशेष मुलाखतीत बोलताना केला. राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जनतेला भारनियमनाचे चटके सहन करावे लागत होते. मात्र आजमितीला ही परिस्थिती सुधारली असून, कोणताही भारनियमन केले जात नसल्याचा दावा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला होता.
अकोल्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया - महावितरण कंपनीकडून उन्हाळ्यामध्ये विजेचा तुटवडा होत असल्यामुळे भारनियमन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंतर भारनियमन रद्द करण्यात आले. मात्र, वेळापत्रकाला बाजूला सारून जिल्ह्यात अघोषित भारनियमन होत असल्याची प्रतिक्रिया शंभू शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात विजेची मागणी किती आहे आणि उन्हाळ्यामध्ये ती किती अधिक वाढते. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यातील विजेचा पुरवठा किती आणि उन्हाळ्यात किती तुटवडा निर्माण होते किती मागणी होते. त्या संदर्भात कुठलीही आकडेवारी महावितरणकडे नसल्याचे दिसून येत आहे.
'वेळापत्रकानुसार भारनियम करावे' : मे महिन्यामध्ये भारनियमन होण्याची शक्यता आहे. ग्रेड नुसार हे भारनियमन करण्यात येणार असल्याचेही समजते. मात्र, या भारनियमनाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून विविध गटात भारनियमन होऊ शकते आणि हे भारनियमन करताना सर्वात कमी उत्पन्न असलेल्या म्हणजेच जी1, जी2, जी3 या गटात सर्वात जास्त वेळ भारनियमन राहण्याची शक्यताही आहे. ज्या गटामधून सर्वात जास्त उत्पन्न होते, त्या भागात भारनियमन कमी राहील, असेही महावितरणने आधी प्रसिद्ध केलेल्या तक्तावरून समोर आले होते. दरम्यान, सध्या जिल्ह्यातील ग्राहकांना अघोषित भारनियमनाचा फटका बसत आहे. यावर मात्र कुठलाही वेळापत्रक नसल्याचं विद्यार्थी निकेश वाघमारे यांनी सांगितले.
महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा बोलण्यास नकार - अघोषित भारनियमनाला विरोध करीत हे भारनियमन बंद करण्यात यावे, अशी मागणी ओमप्रकाश मिश्रा यांनी केली आहे. तर वेळेनुसार भारनियमन केल्यास नागरिकांना त्यांची माहिती राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. देशात जिल्हा सर्वात उष्ण असताना हे भारनियमन करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अघोषित भारनियमनाबाबतीत महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले.