अकोला - जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाळापूर शहरातील सतरंजी पुरा परिसरात राहणाऱ्या एका घराची भिंत कोसळल्यामुळे एका बालकाचा मृत्यू झाला आहे. तर चार बालके जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य सुरू केले आहे. शेख कामरान या नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.
बाळापूर शहरात शुक्रवारी पाऊस पडला. या पावसात सतरंजी पुरा परिसरात राहणारे शेख रसूल शेख वजीर यांच्या विटामातीच्या घराची भिंत सकाळी कोसळली. या घरात रात्री शेख रसूल (42), त्यांची पत्नी शबाना परवीन (38), व त्यांचे चार मुलं शेख नुमान (17), शेख गुफारन (15), शेख फरहान (11) आणि शेख कामरान (9) हे झोपलेले होते. भिंत कोसळल्यानंतर परिवारातील सर्वजण भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले. आरडाओरडा एकूण शेजारी यांना याबाबत कळताच त्यांनी धाव घेतली. एकएक करून सगळ्यांना बाहेर काढण्यात आले. जखमींना बाळापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये शेख कामरान यास मृत घोषित करण्यात आले आहे. शेख कामरान यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व जखमींची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
यांनी केले बचाव कार्य
दरम्यान, या घटनेची माहिती बाळापूर पोलिस आणि तहसील कार्यालयाला देण्यात आली आहे. या घटनेमुळे शेख रसूल यांचा संपूर्ण परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. शासनाकडून ही त्यांना मदत मिळावी अशी मागणी होत आहे. साजिद इकबाल अब्दूल रशीद, वाजीद इकबाल, शहीद इकबाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. विटामातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्याना बाहेर काढण्याचा काम त्यांनी केले.