अकोला - दिल्ली येथील तुगलकाबादमधील संत रोहिदास महाराज मंदिराची जमीन परत करून मंदिराचे पुनर्निर्माण करून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात अनेक नागरिक सहभागी झाले होते.
चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत रविदास महाराजांचे दिल्ली येथील तुगलकाबाद येथे मंदिर आहे. हे मंदिर दिल्ली प्रशासनाने पाडले. हे मंदिर अतिशय प्राचीन व ऐतिहासिक होते. या मंदिराला जी जमीन दिलेली आहे, ती जमीन दिल्ली सम्राट सिकंदर लोधी यांनी रविदास महाराजांना गुरु मानून गुरुदक्षिणेच्या स्वरूपात 12 एकर जागा दिली होती. त्यावर हे मंदिर उभे करण्यात आले होते. येथील सातबारा व इतर दस्तऐवजांची शासकीय दप्तरी तशी नोंद आहे, असे असताना सुद्धा हे मंदिर पाडण्यात आले आहे. त्यामुळे सर्व चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व चर्मकार समाज रस्त्यावर उतरलेला आहे. संत रविदास महाराज मंदिराची जमीन सरकारने परत करून त्या ठिकाणी संत रविदास यांचे मंदिर बांधून देण्यात यावे, अन्यथा चर्मकार समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चर्मकार महासंघ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर रामा उंबरकार, प्रकाश ठोंबरे, सुनील गवई, प्रवीण चोपडे, राधेश्याम कळसकार यांच्यासह आदिच्या स्वाक्षरी आहेत.