अकोला - रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लकडगंज परिसरातून दोन लाख 13 हजार रुपये किंमतीची भांग पोलिसांनी जप्त केली आहे. मनोज बलोदे यांच्या घरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमारे दोन टन भांग जप्त
लकडगंज येथील रहिवासी मनोज रामहरक बलोदे यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने पडताळणी केल्यानंतर सापळा रचून त्याच्या घरात छापा टाकला. घराची झडती घेतली असता बलोदे यांच्या घरातून 2, 135 किलो भांग व सहा किलो भिजवलेली भांग अशाप्रकारे एकूण 2 हजार 141 किलो जप्त केली. ही भांग सुमारे दोन टन असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष पथकांनी मनोज बलोदे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या भांगची किंमत दोन लाख 13 हजार 575 यासून यासह आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन टन भांग जप्त करण्याची कारवाई प्रथमच
भांगची ऐतिहासिक कारवाई राज्यभरात एकाचवेळी सुमारे दोन टन भांग जप्त करण्याची कारवाई प्रथम झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आतापर्यंत भांग जप्त केल्याची माहिती समोर आलेली नाही.