अकोला - अमृत योजनेच्या माध्यमातून अकोला शहराला वाण धरणातून पाणीपुरवठा करण्याचा शासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात अकोट आणि तेल्हारा येथील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. तेल्हारा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आज (शनिवार) बैलबंडी मोर्चा काढत तहसील कार्यालय गाठले. तहसीलदारांना निवेदन देत वाण धरणाचे पाणी अकोला शहराला दिल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
वाण धरणाचे पाणी अकोट, तेल्हारा व बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांना देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. शेतीसाठी आरक्षित असलेले पाणी शेतकऱ्यांना धरणातून मिळत असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी बागायती पेरण्या सुरू केल्या. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नही वाढले आहे. शासनाने या धरणाचे पाणी अकोला शहराला अमृत योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात येथील शेतकरी एकवटले आहे.
हेही वाचा- 'रिपाइं'च्या संकल्प मेळाव्यात फुंकणार धोरणांचे रणशिंग - प्रदेशाध्यक्ष थुलकर
शेतकऱ्यांनी वाण धरणाचे पाणी अकोलेकरांना मिळू नये, यासाठी विविध प्रकारे आंदोलने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनाही निवेदने दिली. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन शेतकऱ्यांना मान्य नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून या निर्णयाचे विरोध होत आहे. परिणामी, तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक मारली.
हेही वाचा- ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरूच राहणार - जिल्हाध्यक्षांची माहिती
'पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं' अशा विविध प्रकारच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करीत अकोला शहराला पाणी देण्यात येऊ, नये, यासाठी आंदोलन छेडले. शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन ठेपल्यानंतर शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार विजय सुरडकर यांना निवेदन दिले. शेतकरी आक्रोश मोर्चाची दखल घेतली नाही. तर, वाण धरणात जलसमाधी घेण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
हेही वाचा- खदानीत बुडालेल्या युवकाला शोधण्यात अखेर यश; अकोल्यातील घटना