अकोला - आयुष्याचा गाडा ओढताना गोरगरीब, अपंगांना मिळेल आणि जमेल ते काम करावे लागत असते. मात्र, अशा विपरीत परिस्थितीतही समाजासाठी आदर्श निर्माण करणारे अनेक आहेत. अशाच प्रकारचा आदर्श येथील एका अंध पती-पत्नी यांनी भिक न मागता स्वाभिमानाने आपल्याजवळ असलेली कला जोपासत ठेवला आहे.
शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अंध ढोलक वादक साहेबराव पातोडे आणि त्यांची अंध हार्मोनियम वादक पत्नी आम्रपाली पातोडे हे कुणासमोरही हात न पसरविता गाणी गात स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची करमणूक करतात. यामधून मिळणार्या पैशातून ते आपल्या दोन मुलांच्या शिक्षणाचा व पालनपोषणाचा खर्च भागवत आहेत. याप्रकारे ते आपला चरितार्थ चालवितात.
दोघे अंध पती-पत्नी स्वतः विविध चित्रपटामधील गाणी, भावगीते, भक्तिगीते आणि भीम गीते गाऊन प्रवाशांचे मनोरंजन करतात. यामुळे बसेसच्या कर्कश आवाजापेक्षा मधुर संगीताचा आणि वाद्याचा आवाज प्रवाशांच्या मनाला आनंद देतो.
आज धडधाकट असूनही अनेक लोक रस्त्यावर भीक मागताना दिसतात. तर काही दिव्यांग रस्त्यावर हात पसरविताना दिसतात. मात्र, काही दिव्यांग स्वाभिमानाने जगण्यासाठी आयुष्याचा गाडा ओढत असतात. त्यांना अनेक अडचणी येतात. मात्र, ते अडचणींना सामोरे जात आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. याचे हे अंध पती-पत्नी उत्तम उदाहरण आहे.
शासनाकडून घरकुल मिळण्याची अपेक्षा -
साहेबराव पाटोळे आणि आम्रपाली पाथर्डी हे दोघे अंध पती-पत्नी बसस्थानकावर गाणे गात आपले जीवन जगत आहेत. त्यांना स्वत:चे घरदेखील नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या घरकुलाची आणि दिव्यांग, गोरगरीबांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे.