अकोला - ऐन दिवाळीत शेतकऱ्यांकडे पैसे नाही. शेतमालाला योग्य दर नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. याविरोधात भाजपने शुक्रवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात 'बेसन भाकर' आंदोलन केले. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी किसान आघाडीचे वैकुंठराव ढोरे, शहराध्यक्ष विजय अग्रवाल, ऍड. देवशीष काकड, यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. विदर्भातील व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे शासनाच्या मदत यादीमध्ये नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले. परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोडधोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
दिवाळीपूर्वी कोरडवाहूला 25 हजार व बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपये प्रमाणे मदत देण्यात यावी, केंद्राच्या एमएसपी कायद्यान्वये 18 प्रकारच्या भरड धान्याची व कापसाची खरेदी तातडीने सुरू करावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. संत्रा, केळी व इतर फळबागांच्या विम्याचे निकष त्वरित रद्द करावेत. किसान क्रेडिट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, सध्या कृषी पंपाचे वितरण बंद असून, ते सुरू करावेत. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा. अशा विविध मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.
निवासी उपजिल्ह्याधिकाऱ्यांना बेसन भाकर देण्याचा प्रयत्न
आमदार रणधीर सावरकर, शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या कक्षासमोर आंदोलन केले. या आंदोलनावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी उपजिल्ह्याधिकाऱ्यांना बेसन भाकर देण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा - अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन
हेही वाचा - अकोल्यात ५०० रुपयाच्या बनावट नोटा चालवणाऱ्या दुकडीला अटक