अकोला - कोरोना महामारीचा प्रकोप जगभरामध्ये पाहायला मिळत आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना लहान मुलांमध्ये पण येण्याची संभावना तज्ञांनी व्यक्त केली आहे. या महामारीमध्ये रुग्णांसाठी व्यवस्था निर्माण करताना प्रशासनाची दमछाक झाली आहे. तरीही प्रशासन आणि रुग्ण यांची सांगड घालत मूर्तिजापूर येथील भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी मुर्तीजापुर मतदार संघामध्ये 330 कोविड बेडची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून केली आहे.
कोरोना रुग्णांना धीर देणे, त्यांच्याशी वॉर्डामध्ये जाऊन संवाद साधून त्यांची विचारपूस करणे, असा नित्यनेम आमदार पिंपळे यांचा आहे. मुर्तीजापूर शहरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात आमदार पिंपळे हे नेहमीच कोरोना रुग्णांमध्ये रुळतात. विशेष म्हणजे, ते कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेलेले आहेत.
मूर्तिजापूर मतदारसंघ कोरोनाचा हॉटस्पॉट -
जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघांमध्ये पहिल्या वर्षी रुग्णांची संख्याही नगण्य होती. परंतु, दुसऱ्या लाटेमध्ये हळूहळू मुर्तीजापुरमध्ये या रुग्णांची संख्या वाढत गेली आणि मूर्तिजापुर तालुका हा 'हॉटस्पॉट' ठरला. यावेळी मुर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना बेडची व्यवस्था करून देण्यासाठी प्रशासनाची मोठी दमछाक झाली. या मतदारसंघातील आमदार हरीश पिंपळे यांनी परिस्थितीची जाण ठेवत स्वतःकडील असलेल्या कार्यकर्त्यांच्या फौजेला हाताशी धरून कोरोना रुग्णांच्या सेवेत त्यांनी स्वतःला झोकून दिले. या दरम्यान त्यांना कोरोनाचीही लागण झाली. मात्र त्यातून सुखरूप बाहेर आल्यानंतरही त्यांनी हे कार्य सुरूच ठेवले.
हेही वाचा - मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 31 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या
कोरोना रुग्णांच्या मदतीला आमदार हरीश पिंपळे
लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था वाढविण्यासोबतच तेथे ऑक्सिजन प्लांट उभे करणे, ऑक्सिजन ड्युरा सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था त्यांनी करून घेतली. ऑक्सिजन आणि औषधी परिपूर्ण हे रुग्णालय झाले आहे. सोबतच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट, व्हेंटिलेटर आदिची व्यवस्था त्यांनी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नको म्हणून आमदार हरीश पिंपळे यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांना समोर करून प्रशासनाच्या माध्यमातून मुर्तीजापुर मतदारसंघासाठी 330 कोविड बेडची व्यवस्था केली आहे. यासाठी नगर परिषद, शिक्षक संघटना, सामाजिक संघटना व इतर लोकप्रतिनिधींची त्यांनी मदत घेतली आहे. तसेच मुर्तीजापुर शहरापासून जवळच असलेल्या हेंडज या ठिकाणीही दीडशे बेड रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून उभे करण्यात आले आहे.
ही सर्व व्यवस्था उभी करताना आमदार हरीश पिंपळे यांनी मात्र कोरोना रूग्णांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम सुरूच ठेवला. तसेच कुठल्याही गावात असलेल्या कोरोना रुग्णाला तातडीने उपचार मिळावे, यासाठी ते धडपडत आहेत. त्यांच्या मतदारसंघात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ते नेहमी भेट देत आहेत. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेत आहेत. तसेच कोरोना रुग्णांची ते आत्मीयतेने चौकशी करीत आहेत. ते एवढ्यावरच नाही थांबले तर मुर्तीजापुर लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या कोरोना वॉर्डात ते जातात. तेथील रुग्णासोबत चर्चा करतात. त्यांना धीर देतात. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतात. विशेष म्हणजे, कोरोना वॉर्डात जाताना ते कुठल्याही प्रकारची पीपीई किट घालत नाही. फक्त तोंडावर मास्क असले तर ते थेट कोरोना वॉर्डात जाऊन रुग्णांशी चर्चा करतात. बराच वेळ त्या ठिकाणी ते थांबतातही. तेथे असलेल्या परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत रुग्णांच्या संदर्भातील आढावा घेतात.
विशेष म्हणजे, त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी रुग्णांसाठी बेडची अतिरिक्त व्यवस्था तसेच तिसर्या लाटेत लहान मुलांवर कोरोना येण्याच्या शक्यतेची जाण ठेवत लहान मुलांसाठी बेडची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व व्यवस्था उभी करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला नाही. मात्र, त्यांनी प्रशासनाला पाठबळ देऊन ही यंत्रणा उभी केली आहे.
हेही वाचा - 'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून अतिरिक्त ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्रिया पूर्ण करू'