अकोला - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नगरसेवक सतीश ढगे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षातर्फे एकही अर्ज सभापतीपदासाठी नसल्यामुळे ही निवड झाली आहे.
अकोला महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांचा कार्यकाळ संपला होता. यामुळे नव्या सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार भाजपतर्फे नगरसेवक सतीश ढगे यांचा अर्ज भरण्यात आला होता. तर विरोधकांकडून एकही अर्ज सभापतीपदासाठी दाखल झाला नव्हता. त्यामुळे सतीश ढगे हे बिनविरोध निवडून आले असल्याचे सिद्ध झाले होते.
दरम्यान, मनपाच्या सभागृहामध्ये स्थायी समिती सभापती पदाची निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली. सभापतीपदासाठी एकच अर्ज असल्यामुळे भाजपचे नगरसेवक सतीश ढगे यांना स्थायी समिती सभापतीपदी अविरोध निवडण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी सभापती सतीश ढगे यांची मिरवणूकही काढण्यात आली.
हेही वाचा - निराश झालेले खैरे म्हणतात.. मरेन तर भगव्यातच!
आई आणि पत्नीच्या डोळ्यातून आनंदाश्रू -
सभापती सतीश ढगे यांचे वडील गणेश ढगे हे पाच वेळा नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत. त्यांच्यानंतर त्यांची पत्नी आणि नंतर ते नगरसेवक झाले. बऱ्याच वर्षानंतर पक्षाकडून त्यांना सभापती पदाची संधी मिळाली. सभापती झालेले सतीश ढगे यांना आई आणि पत्नी ओवळताना त्यांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू निघाले. यावेळी संपूर्ण परिसर भावुक झाला होता.