अकोला - शेतकऱ्यांचा शेतात पडलेला कांदा खरेदीसाठी व्यापारी फिरकत नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किंवा मार्केटची सोय करण्याची मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे. देशभर लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद आहेत. याचाच फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला येथील आठ ते दहा गावांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या वर्षीसुद्धा बाराशे ते पंधराशे एकरवर कांद्याची लागवड झाली आहे. कांदा काढणीला सुरुवात झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा काढून झाला आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे एकही व्यापारी कांदा खरेदीसाठी येत नाही. तळेगाव डवला या परिसरातील कांदा दरवर्षी व्यापारीवर्ग स्वतः येऊन चांगल्या भावाने घेऊन जातात. पण यावर्षी कांद्याला कोणत्याही व्यापाऱ्याकडून मागणी होत नसून लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे तळेगाव डवला शिवारामध्ये व तेथील सात ते आठ गावांमध्ये कांद्याचे ढीग लागलेले आहे. जर का तो विकला गेला नाही तर कांदा जागेवरच सडण्याची भीती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे एखादा व्यापारी जर आला तर तो अगदी कमी भावाने कांद्याची मागणी करत आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी सरकारच्या दरबारी तळेगाव डवला व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने विजय ताथोड कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे.