अकोला - भारिप-बहुजन महासंघाने जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. जिल्ह्यात 4 आमदार आणि खासदार तथा केंद्रीय मंत्री असणाऱ्या भाजपचा मात्र दारुण पराभव झाला आहे. तर, शिवसेनेनेही मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
53 जिल्हा परिषद गट आणि 106 पंचायत समिती गणांसाठी 7 जानेवारीला मतदान पार पडले. आज (8 जानेवारी) जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये भारिप बहुजन महासंघाने आपले वर्चस्व कायम ठेवत 53 पैकी 22 आणि पक्ष समर्थक तसेच अपक्ष मिळून 26 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापनेसाठी 27 ही संख्या आवश्यक असल्याने सत्तेसाठी भारिप कोणाला सोबत घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारिपने सात पैकी अकोला, बाळापूर आणि अकोट या तीन पंचायत समितींवर निर्विवाद सत्ता स्थापन करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
या निवडणुकीत भारिपने 18 आयात उमेदवार दिले होते. तरीही पक्षांतर्गत बंडखोरी डावलून भारिप विजयी झाला आहे. दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे हे कान्हेरी गटातून पराभूत झाले आहे. तर, निवडून येण्याची शक्यता कमी असलेले ज्ञानेश्वर सुलताने मात्र विजयी झाले आहेत. शिवसेनेपासून दूर गेलेले आणि भारिप बहुजन महासंघासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धावून जाणारे चंद्रशेखर पांडेही यावेळी भारिपच्या तिकीटवर निवडून आले आहे.
हेही वाचा - नागपूर जि.प. निवडणूक : गृहमंत्र्यांच्या पुत्राचा तब्बल चार हजार मतांनी विजय
जिल्ह्यात भाजपची मोठी पकड आहे. मात्र, भाजप या निवडणुकीत हवे तसे यश मिळवू शकलेला नाही. विशेष म्हणजे, दगडपारवा येथील भाजपच्या उमेदवारांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. तिथेही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2014च्या निवडणुकीत शिवसेना 8 जागांवर विजयी झाली होती. मात्र, यावर्षी मुसंडी मारत 13 जागांवर सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवारही स्वबळावर निवडून आले आहेत.