अकोला - यश प्राप्त करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, माझ्या मते स्वत:ची किंमत स्वत:ला ठरवता आली पाहिजे तरच तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त करू शकता, असा सल्ला दुबई येथील मसाला व्यवसायिक धनंजय दातार यांनी दिला. वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या दुपारच्या सत्रात अभिनेते भारत गणेशपुरे यांनी धनंजय दातार यांची मुलाखत घेतली. हास्यविनोद आणि यशाचे गमक या दोन्ही मुद्यांवर यावेळी मान्यवरांनी दिलखुलास चर्चा केली.
अभिनेते भारत गणेशपुरे यांनी धनंजय दातार यांच्याकडून दुबई येथील व्यवसायासंदर्भात तेथील शासनाच्या असलेल्या विविध करप्रणालीबाबत माहिती यावेळी जाणून घेतली. भारत देशातील करप्रणालीबाबत गणेशपुरे यांनी हास्यविनोदात माहिती दिली. अभिनेते गणेशपुरे यांच्या मिश्किल प्रश्नांनी प्रेक्षक हास्यकल्लोळात बुडाले. दुबईमधील व्यवसायात मिळवलेले यश आणि त्यासाठी लागलेल्या परिश्रमाच्या संदर्भातही अभिनेते गणेशपुरे यांनी धनंजय दातार यांच्याकडे विचारणा केली.
भारत देशात मसाल्याचा व्यवसाय तुम्ही करणार का? असा प्रश्न दातार यांना अभिनेते गणेशपुरे यांनी विचारत आपल्या या व्यवसायातून बेरोजगारांनाही संधी मिळणार असल्याचेही सांगितले. दुबईतील व्यवसाय चित्रपट क्षेत्र यासह सह अनेक विषयांवर अभिनेते भारत गणेशपुरे यांनी धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत घेत हास्यविनोद केले. या मुलाखत कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी केली होती.