अकोला - जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड पहिल्यांदाच लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लाभार्थ्यांची निवड ही पारदर्शकपणे करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग केला आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग, कृषी व पशु संवर्धन, समाज कल्याण आदी विभागांमार्फत शेष फंडातून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांमार्फत लाभार्थ्यांना सामूहिक व वैयक्तिक लाभ देण्यात येतात. ज्यामध्ये ताडपत्री, शिलाई मशीन, सायकल, पाळीव जनावरे यांचा समावेश असतो. सध्या जिल्हापरिषदेत प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहत आहेत.
योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य आपल्या कार्यकर्त्यांची व स्वकीयांची लाभार्थी यादी मध्ये नावे समाविष्ट करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे खरा लाभार्थी हा लाभापासून वंचित राहत असल्याचे लक्षात घेऊन यावर्षी 'लकी ड्रॉ' पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.